जलजीवन मिशन पथकाने केले 16 गावांचे सर्वेक्षण

गोंदिया ◼️जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे गावात केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय जलजीवन मिशनचे पथक जिल्ह्यात आले होते. या पथकाने 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील 16 गावांची निवड करुन या गावातील कामांची व राबविण्यात येणार्‍या अभियानाची तपासणी केली.

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत विविध विकास कामे करण्यात येत असून अनेक गावातील कामे पूर्णत्वास आले आहे. तर अनेक गावातील कामे प्रगतीपथावर आहेत. दरम्यान गावात स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो का?, गावातील स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता व शुद्धता, महिला समिती व पाणीपुरवठा समिती आहे की नाही या बाबींची तपासणी या पथकाच्या माध्यमातून करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावरुन या पथकाची निवड केली असून पथकामार्फत तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

या पथकाने अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील 16 गावांची निवड करुन या गावात 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान तपासणी अभियान राबविण्यात आले. यात गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता समितीचे कार्य, पाण्याची गुणवत्ता व शुद्धता, महिला व पाणीपुरवठा समितीचे कार्य आदींचे सर्वेक्षण करुन ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जलजीवन मिशन व 15 व्या वित्त आयोग, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या कामांची तपासणीही यावेळी करण्यात आली. या पथकामध्ये राष्ट्रीय जलजीवन मिशन नवी दिल्लीचे अनिलकुमार बाहरी, प्रकाश समरे यांचा समावेश होता.

Print Friendly, PDF & Email
Share