कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांचा तलावात बुडून मृत्यू

गोंदिया : फिरायला गेलेल्या कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. ही घटना छत्तीसगडमधील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनगट्टा गावात घडली आहे. तीनही मृत शिक्षक हे गोंदियात एका कोचिंग क्लासमध्ये शिकवत होते. तिन्ही मृत शिक्षक हे नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

हे शिक्षक गोंदियातील सिद्धिविनायक कोचिंग क्लासमध्ये JEE आणि NEET ची कोचिंग घेत होते. काल (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने  कोचिंग क्लासमधील तीन शिक्षकांसह चार जण फिरायला छत्तीसगड राज्यात गेले होते. दरम्यान त्यापैकी तिघेही एका तलावात आंघोळीसाठी उतरले. मात्र त्यांच्यासोबत असलेले नारायण साळवे हे तलावाच्या बाहेरच राहिले. खूप वेळपर्यंत ते तिघेही पाण्याबाहेर न आल्याने बाहेर असलेल्या नारायण साळवे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे तिथे नागरिकांची गर्दी झाली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

रात्री एक मृतदेह सापडला, दोन मृतदेह सकाळी सापडले

घटनेची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर शोधकार्य आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. रात्रीपर्यंत एक मृतदेह हाती लागला होता. अंधार पडल्याने शोध आणि बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केल्यानंतर अन्य दोन मृतदेह सापडले. 

तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात हळहळ

एन. मिश्रा (रा. भिलाई), अरविंद सर (रा. उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू , नागपूर अशी मृत शिक्षकांची नावं आहेत. रात्री एक तर आज सकाळी अन्य 2 मृतदेह गवसले असून राजनांदगाव इथे शवविच्छेदन करता पाठवण्यात आले आहे. गोंदियातील सिद्धिविनायक कोचिंग क्लासमध्ये शिक्षक असलेले चार शिक्षक सुट्टी असल्याने फिरायला गेले. परंतु पिकनिकदरम्यान अशी दुर्घटना होईल अशी कोणालाही कल्पना नसावी. चार पैकी तीन शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Share