अनियोजित बसेसमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

देवरी ◼️ ‘विद्यार्थी देशाचे भविष्य’ याची जाणीव ठेवत केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलतीत पुरविल्या जातात. केंद्र सरकार मानव विकास कार्यक्रम अंतर्गत तर राज्य सरकार मार्फतही विद्यार्थ्यांच्या प्रवास सवलतीवर विशेष भर दिले जाते. देवरी-आमगाव मार्गावरून देवरीला विविध शाखेत शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी प्रवास करतात. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या हलगर्जीने या मार्गावर देवरीला प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांना पहिल्या तासिकेपासून वंचित राहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

देवरी येथे विविध शाखेचे शाळा, विद्यालये असून सकाळ पाळीतील तासिका सकाळी 7:30 वाजे सुरू होतात. बसस्थानकापासून शाळा, विद्यालयांचे अंतर दोन किमीहूनही लांब असल्याने पायवाटेतच विद्यार्थ्यांच्या अर्धा तास निघून जातो. सकाळी 7 वाजे दरम्यान बस देवरीला पोचल्यास विद्यार्थ्यांना पहिल्या तासिकेला हजेरी लावता येते. अशात गोंदिया आगाराची बस उपलब्ध असली तरी साकोली आगाराची बस देवरीला 7:30 वाजे दरम्यान पोहचत असल्याने विद्यार्थ्यांना दररोज पहिल्या तासिके पासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्याना होणार्‍या समस्येची जाणीव पालकवर्ग व विद्यालयानी तत्कालीन साकोली बस आगार व्यवस्थापक शेंडे यांना केली होती केली होती, त्यावर शेंडे यांनी सदर बसफेरी आमगाव वरून सकाळी 6:15 वाजता सोडल्याने विद्यार्थ्यांना वर्षभर मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यांची बदली होताच त्या बसच्या वेळेत अनियमितता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा पहिल्या तासिकेपासून वंचित व्हावे लागते. तभाने विद्यार्थ्यांच्या हित दृष्टीने कार्यरत साकोली बस आगार व्यवस्थापक आगरकर यांचेशी संपर्क साधून, विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव करून दिली असता, आगरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सोईस्कर वेळी सदर बस सोडण्याचे आश्‍वासन दिले आहे.

Share