एकाच मार्गावर जाण्या-येण्यासाठी एसटीचे वेगवेगळे भाडे, महिला सन्मान योजनेचा फज्जा !
◼️महिला सन्मान योजनेच्या तिकीट दरात घोळ
Gondia ◼️ राज्य सरकारने महिलांच्या प्रवासासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या बसमध्ये ‘महिला सन्मान योजना’ 17 मार्च पासून सुरू केली. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली जात आहे. परंतु एकाच मार्गावर जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे भाडे आकारले जात असल्याचे उघडकीस आले असून ही तांत्रिक चूक अडचणीची ठरत असल्याने प्रवासी संघटना व महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. नागपूर विभागाच्या गणेशपेठ आगारातून धावणाऱ्या सर्व बसगाड्यांमध्ये महिला सन्मान योजनेत गोंदिया ते बालाघाट व बालाघाट ते गोंदिया बस गाड्यांमध्ये नियमानुसार ४५ रुपये भाडे आकारण्यात येते. हे तिकीट दर योग्य आहे.
मात्र भंडारा विभागाच्या तिरोडा, गोंदिया, साकोली व तुमसर आगाराच्या बसेसमधून याच मार्गासाठी 55 रुपये आणि 45 रुपये भाडे आकारण्यात येत आहे. हे भाडे गोंदिया ते बालाघाट जाण्याकरिता 55 रुपये आणि बालाघाट ते गोंदिया असे येण्याकरिता 45 रुपये आकारण्यात येत आहे. एकाच मार्गावर जाण्या-येण्यासाठी तिकीट दरात दहा रुपयांची ही तफावत महिला प्रवाशांना बुचकळ्यात टाकणारी आणि पर्स रिकामी करणारी आहे.
या प्रकरणी गोंदिया आघाराचे व्यवस्थापक अनिकेत बल्हाड यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधले असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
एकाच मार्गावर चालणाऱ्या बसेसमध्ये एकसारखे दर असायला पाहिजे. मग ती कोणत्याही आगाराची बस असो, असा नियम असताना महिला सन्मान योजनेच्या बस भाड्यात तफावत आहे. याबाबत महामंडळाच्या मुख्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप दखल घेण्यात आली नाही.
नरेशकुमार जैन सदस्य- प्रवासी संघटना ( राज्य परिवहन)