ब्लॉसम स्कूलची इशिता उंदीरवाडे विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मानित

◼️देवरी तालुक्यातून १० वी च्या परीक्षेत अव्वल आल्याबद्दल सत्कार

देवरी ◼️सरस्वती विद्यालयात अर्जुनी मोर. येथे आयोजित प्रेरणात्मक व्याख्यान कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, माजी मंत्री राजकुमार बडोले, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक बनकर, गोंडवाना विद्यापीठाची कुलसचिव डॉ. हिरेखन, हेमंत सुटे, डॉ. बल्लभदास भुतडा, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय कापगते, शुभांगी मेंढे, शारदा बडोले उपस्थित होते.

यावेळी गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात देवरी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल ब्लॉसम पब्लिक स्कूल ची इशिता चरणदास उंदीरवाडे हिचा सत्कार करण्यात आला. या सोबतच अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सुरबन बोडगाव येथील मूळचा रहिवासी असलेला अमित उंदिरवाडे याने यूपीएससी परीक्षेत ५८१ वी रँक मिळवली. त्याचे भरभरून कौतुक करत सत्कार केला. सोबतच हेमंत सुटे, योगिता मोझे, काजल रुखमोडे, धीरज भिवगडे सौंदड , पर्व रामटेके खजरी, मीनाक्षी कोसरकर खजरी, ईशिता उंदिरवाडे देवरी, हिमांशी करंजेकर, प्रेरणा हासिजा , हितेश्वरी शहारे, यशपाल गोंडाणे, आचल गुप्ता सालेकसा यांचा सत्कार केला .

माझ्यात सूर्यासारखं तेज नाही. पण मी काजव्यासारखं चमकेन. मी उडू शकत नाही पण धावेनधावू शकलो नाही तरी चालू शकेन. नाही चालू शकलो तरी सरपटन जाईन पण ध्येय साध्य करणार. हे क्रांतीचं वय आहे. शिवाजींनी १६-१७ व्या वयात स्वराज्याचं नंदनवन स्थापन केलं. हीच उमेद जागविण्याची, इतिहास घडविण्याची सुरुवात आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यावं हे आपल्या हाती नसले तरी पुरुषार्थ दाखवणं आपल्या हातात आहे. एकदा ठरवलं की मागे वळून पाहायचं नाहीअसे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. प्रेरणात्मक व्याख्यान ऐकण्यासाठी लांबवरून युवावर्ग व पालकवर्गाची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.

Print Friendly, PDF & Email
Share