जिल्हातील 79 प्राथमिक शिक्षकांना उच्च शिक्षणाची परवानगी
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत सर्व संवर्गातील कर्मचार्यांना शैक्षणिक अर्हता वाढविण्याच्या दृष्टीने परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाते. या नियमांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी विभागाकडे उच्च शिक्षणाकरिता परवानगी मागितली होती. दरम्यान, शिक्षण विभागाने अटी-शर्तीच्या अधीन राहून 79 शिक्षकांना उच्च शिक्षणाची परवानगी प्रदान केली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना शैक्षणिक अर्हता वाढविण्याच्या दृष्टीने परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाते. याअंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनातील कार्यरत शाळेतील शिक्षकांनी उच्च परीक्षेला बसण्याच्या परवानगीसाठी विनंती अर्ज केले होते. शासनाने दिलेल्या आदेशान्वये अधिकाराचा वापर करून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी नियमाच्या अधिन राहून जिल्ह्यातील 79 शिक्षकांना परवानगी प्रदान केली आहे. यामध्ये 24 शिक्षिका व 55 शिक्षकांचा समावेश आहे. परवानगी प्रदान केलेल्या आदेशात शिक्षकांना अभ्यास करण्यासाठी किंवा परीक्षा देण्यासाठी विशेष रजा, प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत परवानगी कायम राहील. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उच्च वेतनश्रेणी किंवा बढती मिळेल, याची हमी नाही, असे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, परवानगी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांचे नावे या यादीत नसल्यामुळे पक्षपात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. परवानगी प्रदान करण्यात आलेल्यामध्ये गोंदिया पंचायत समिती अंतर्गत कार्यरत 18, गोरेगाव 10, सडक अर्जुनी 3, देवरी 17, सालेकसा 4, अर्जुनी मोरगाव 4, आमगाव 20 व तिरोडा पंचायत समितीच्या 3 शिक्षकांचा समावेश आहे. (Primary teachers)