देवरी❗️बंदूके सोडून तिने निवडली पुस्तके आणि झाली १२ वी पास, कथा एका नक्षलीची…

◼️आत्मसमर्पित नक्षली राजूला हिचीयशस्वी भरारी निखिल पिंगळे आणि समृद्धी पिंगळे यांचे हस्ते सत्कार

डॉ. सुजित टेटे@प्रहार टाईम्स

देवरी ◼️ राजुला हिदामी नावाच्या एका 15 वर्षाच्या मुलीने गडचिरोली परिसरात आपली दहशत निर्माण केली होती, पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार करणे पासून ते लूटमार सारखे 6 गंभीर गुन्हे तिच्या नावावर होते शिवाय अत्याधुनिक हत्यारे चालवण्यात ती तरबेज होती, परंतु इतक्या कमी वयात ह्या मुलीने हातात बंदूक का घेतली याचा अभ्यास करून व तिची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेऊन पोलिसांनी एक नक्षलवादी म्हणून वागणूक न देता सहानुभूती पूर्वक त्या तरुणी सोबत संवाद केला व यातून परस्परांविषयी विश्वास येऊन त्या मुलीने 2018 साली हातातील बंदूक खाली ठेवून शरणागती पत्करली.

आत्मसमर्पित नक्षल कु. राजुला @ अनिता रवेलसिंग हिडामी, वय 21 वर्षे राहणार – लवारी, पोस्ट- पुराडा, ता- कुरखेडा, जि. गडचिरोली हीला नक्षलवाद्यांनी जबरीने नक्षल चळवळीत जुलै 2017 ( कोरची कुरखेडा खोब्रमेंढा KKD दलम, पक्ष सदस्य म्हणून), सहभागी करून घेतले होते. परंतू नक्षलवाद्यांबरोबर राहून जिवन जगत असतांना तिला येणाऱ्या अडचणीमुळे ती कंटाळली होती. तीला नक्षल (संघटनेत) चळवळीत रस नव्हते. त्यामुळे तीने गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर दि 24/08/2018,रोजी शरणागती पत्करली होती.

२०१९ ते २०२१ मध्ये गोंदियात आठवी ते दहावीच्या परीक्षेत तिला मराठी भाषा आणि गणित विषयाच्या संकल्पना समजावण्यासाठी नक्षल सेलमधील देवरी येथील कर्माचार्यांनी तिला ‘ट्यूशन शिक्षक’ म्हणून काम केल्याने तिच्या अभ्यासामध्ये दुप्पट वाढ झाली. त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी तिच्यासाठी शाळेचे एक किट, स्कूल बॅग, पुस्तके, सायकल आणि गणवेश देखील खरेदी करून दिले. नक्षल सेलने रजूला हिडामी ला नवीन वातावरणात स्थायिक व समायोजित करण्यास मदत केली.

गोंदिया जिल्हा पोलिसांना शरणागती पत्करल्या नंतर पोलीस दलातर्फे तत्कालीन पोलीस अधीक्षक हरीस बैजल, अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांचे प्रयत्नाने कु. राजुला हीचे पुनर्वसन करण्यात येवुन शासनाच्या आत्म समर्पण योजनेच्या माध्यमातून ती अगोदरची 7 वी पास असल्याने व तीला पुढे शिकण्याची इच्छा व आवड असल्याने तीला सन 2018 मध्ये देवरी येथील सरकारी शाळेत 8 वी मध्ये प्रवेश देण्यात आला होता पुढे गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे सहकार्याने नियमित शिक्षण घेत जून 2021 मध्ये तिने 10 वी ची परीक्षा मध्ये 51. 80% गुण मिळवून उत्तीर्ण केली. त्याचप्रमाणे मनोहरभाई पटेल ज्यु. कॉलेज देवरी येथे शिक्षणं घेत असताना तिने 2023 मध्ये 12 वी ची परीक्षा दिली असून तिने 46% गुण मिळवून उत्तीर्ण केली आहे. कुमारी राजुला हिने माओवादी विचारसरणीला डावलून, हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यानंतर अथक परिश्रम घेवून 10 वी, 12 वी चे शिक्षणं पुर्ण करीत घेतलेली यशस्वी भरारी कौतुकास्पद असल्याने तिचा सन्मान म्हणुन दिनांक 27/05/2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया कॉन्फरन्स हॉल येथे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व श्रीमती समृद्धी पिंगळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला व तिच्या भावी पुढील वाटचाली साठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी कु. रजुला हिने आपले मनोगत व्यक्त करताना पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पोलिस दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तिचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. सदर सत्कार कार्यक्रमा प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. दिनेश तायडे, श्रीकांत हत्तीमारे , तसेच नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share