गोंदिया जिल्हातील विद्यार्थ्यांना गणवेशासोबत मिळतील बुट, मोजे, वह्या
गोंदिया◼️ पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, एससी, एसटी प्रवर्ग व दारीद्रयरेषेखाली असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दर शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश दिला जातो. आता गणवेशासोबत बुट, मोजे व वह्याही देण्यात येणार आहेत. राज्यात येत्या शैक्षणिक सत्रापासून ‘एक रंग-एक गणवेश’ धोरण लागू करण्यात येणार आहे. अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. यासाठी गत अर्थ संकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली आहे. गोंदियातील वर्ग 1 ते 8 वीपर्यंतचे सुमारे 74 हजार 945 विद्यार्थी लाभान्वित होतील. यामुळे आतापासूनच पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्सूकता पहावयास मिळत आहे.
विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात येत्या 15 जूनपासून तर विदर्भात 27 जूनपासून शाळा सुरू होत आहेत. त्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वी शासनाने सर्व सरकारी शाळांसाठी ‘एक रंग-एक गणवेश’ धोरण जाहीर केले आहे. शालेय शिक्षण मंत्री, शाळा व्यवस्थापन आणि अधिकार्यांसोबत नुकतीच बैठक झाली. बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनाही मोफत पुस्तक आणि गणवेश पुरवला जाणार आहे. त्यामुळे या संस्थांनाही ‘एक रंग-एक गणवेश’ धोरणाचा अवलंब करावा लागेल, असे संकेतही केसरकरांनी दिलेत. ‘एक रंग-एक गणवेश’ वितरणामुळे शाळा प्रशासनाचीही चिंता मिटणार आहे. गोंदिया जिल्ह्यात 1065 शाळा आहेत. या शाळांतील वर्ग 1 ते 8 वीपर्यंतच्या सर्व मुली 37706, एससी मुले 4053, एसटी मुले 6705 व दारिद्रय रेषेखालील 26481 मुले असे एकूण 74 हजार 945 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे व वह्या मिळणार आहेत.
तालुकानिहाय शाळा व विद्यार्थी संख्या
तालुका शाळा विद्यार्थी
गोंदिया 208 19015
गोरेगाव 108 7903
आमगाव 110 7779
देवरी 142 6508
सालेकसा 109 6500
तिरोडा 144 11541
स. अर्जुनी 109 7427
अर्जुनी मोर. 132 8272