एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल बोरगाव बाजार या शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 आणि 12 वी मध्ये मारली बाजी

देवरी ◼️केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मार्फत दिनांक 12 मे 2023 रोजी सत्र 2022-23 मधील इयत्ता 10 आणि 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी एकलव्य बोरगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत यश मिळवलं आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तसेच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने आदिवासी विकास विभाग मार्फत गोंदिया जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या अधीनस्त एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल बोरगाव बाजार ही शाळा सन 2014 पासून सुरू झालेली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, निवास, भोजन व इतर भौतिक सोयी सुविधा पुरविल्या जातात. तरी या शाळेतील इयत्ता 10 विचा निकाल 93.22 % लागलेला असून 59 विद्यार्थ्यांपैकी 55 विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहे. इयत्ता दहावी मध्ये मुस्कान सुधीर मसराम (प्रथम – 77.40%), श्रद्धा भरत काठेवाड (द्वितीय -76.40%) आणि जयशीला पून्नुलाल मडावी (तृतीय – 73.00%) या विद्यार्थिनींनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावित घवघवीत यश संपादन केलं आहे. त्याचबरोबर इयत्ता बारावीचा निकाल ९१.६७ टक्के लागलेला असून 84 विद्यार्थ्यांपैकी 77 विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. इयता बारावी मध्ये हितेशकुमार कृष्णा पडोटी (प्रथम – 76.60%), अश्विनी शंकरलाल उईके (द्वितीय 71.00%) आणि विवेक प्रल्हाद राऊत (तृतीय – 69.40%) यांनी यश संपादन केलेले आहे. या यशाबद्दल सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि ध्येयाने झपाटून केलेल्या अभ्यासामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचं देवरी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. विकास राचेलवार, एकलव्य निवासी शाळा बोरगाव बाजार येथील प्राचार्य श्री. संजय बोंतावार तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यानी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल आई वडीलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Share