कत्तलखान्याकडे जाणार्या आठ जनावरांची सुटका
गोंदिया : जिल्ह्यातील चिचगड पोलिस ठाणे अंतर्गत कोटजांभोरा ते नवेगावबांध मार्गाने 18 एप्रिल रोजी कत्तलखान्याकडे अवैधरित्या जनावरांची वाहतूक होणार्या वाहनांवर नाकाबंदी करीत पोलिसांनी 8 जनावरांची सुटका केली. या कारवाईत 2 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील शेजारील छत्तीसगड व मध्यप्रदेशात कत्तलखान्याकडे जनावरांची अवैधरित्या वाहतूक होते. यावर आळा घालण्याकरिता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभाग मोहिम (Rescue animals) राबवित आहे. यातंर्गत 18 एप्रिल रोजी कोटजांभोरा ते नवेगावबांध मार्गाने अवैधरित्या जनावरांची कत्तलखान्याकडे होत असल्याची माहिती चिचगड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कोटजांभोरा ते नवेगावबांध मार्गावर नाकाबंदी दरम्यान एक अशोक लेलँड कंपनीचा पिकअप वाहनाची तपासणी केली असता, वाहनात 8 जनावरे कोंबून वाहतूक होत असल्याचे दिसले. पोलिसांनी जनावरांची सुटका करुन त्यांना गोशालेत पाठविले. याप्रकरणी पोलिसांनी वाहन जप्त करुन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.