कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतून काँग्रेस, राष्ट्रवादीची माघार

देवरी◼️ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्याने भाजप समर्थित पॅनलचे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. गुरुवार 20 एप्रिल रोजी नामनिर्देशन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. अठरापैकी 18 संचालक भाजपचे निवडून आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधून राष्ट्रवादीचा संपूर्ण सफाया झाला असून भाजपने एक हाती सत्ता स्थापन केली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 संचालकांसाठी निवडणूक होणार होती. याकरिता भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली होती. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त संचालक निवडून यावे याकरिता सर्वांनी रणनीती आखली होती. या निवडणुकीकरिता विविध गटातून एकूण 59 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते.

छाननीमध्ये व अपीलमध्ये प्रत्येकी 2 असे 4 उमेदवारांचे नामांकन रद्द झालेे. 55 नामांकन वैद्य ठरले होते. यापैकी 37 उमेदवारांनी गुरुवारी त्यांचे नामांकन परत घेतले. भाजपच्या 18 उमेदवारांचे नामांकन वैध ठरले. इतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून निवडून आलेले काँग्रेसचे गणेश भिलावे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भटक्या विमुक्त जमातीमधून निवडून आलेले चिचगडचे काँग्रेसचे कार्यकर्ते द्वारका घरमगुडे, हमाल व तोलारी गटातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मारुती खंडारे यांनी भाजपला पाठिंबा दिला. बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये सेवा सहकारी संस्था गटाचे सुखचंद राऊत, प्रमोद संगीडवार, यादवराव पंचमवार, श्रीकृष्ण हुकरे, कमल येरणे, बबलू डोये, आसाराम पालीवाल, महिला राखीव गटातून गोमती तितराम, देवकी मरई, इतर मागासवर्ग प्रवर्गातून गणेश भेलावे, भटक्या विमुक्त जमातीमधून द्वारका धर्मगुडे, ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण गटातून अनिल बिसेन, शिवदर्शन भेंडारकर अनुसूचित जाती जमाती गटातून धनराज कोरोंडे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून विजय कश्यप, व्यापारी व अडत्या गटातून दीपक अग्रवाल, अंशुल अग्रवाल, हमाल व तोलारी गटातून मारुती खंडारे यांचा समावेश आहे.

Share