आदिवासी विकास विभागाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा: अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे

गोंदिया◼️विविध योजनांची माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द करण्यात येते. परंतू आजही ग्रामीण भागामध्ये योजनांची माहिती पोहचत नाही, योजनांची माहिती होत नसल्यामुळे अत्यंत गरीब आदिवासी लाभार्थी आदिवासी विकासाच्या योजनांपासून वंचित राहतात. गरजू लाभार्थीना लाभ मिळाला आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेवून आपल्या गावातील गरजू आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले.

जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्त नागपूर दशरथ कुळमेथे, देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचलवार प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत मागील दोन वर्षात आश्रमशाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची झालेली प्रगती, भाषा वाचन व लेखनातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच 11 एप्रिल ते 9 मे दरम्यान इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्‍या उन्हाळी अभ्यासक्रम शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. यावर्षी देवरी प्रकल्पातून 20 विद्यार्थ्याना भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोकरीता अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला असून आश्रमशाळेतील निवडक विद्यार्थ्यांची निवड करून प्रथमच विमानाने प्रवास करण्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिप महिला व बालकल्याण सभापती महिला सविता पुराम, देवरी पंचायत समिती सदस्य अंबीका बंजार, अर्जुनी मोर पंचायत समिती सभापती सविता कोडापे, जिल्हा परिषद सदस्य रजनी कुंभरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी हरिश्चंद्र सरियाम यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.

Print Friendly, PDF & Email
Share