5G च्या युगात देवरी तालुक्यात नेटवर्क समस्या, इंटरनेट स्पीडमुळे मनस्ताप !
विविध कारणांमुळे सर्वच मोबाइल कंपन्यांच्या वापरकर्त्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देवरी ◼️ मोबाइलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे.. ४जी व ५जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. विविध कारणांमुळे सर्वच मोबाइल सिमकार्डकंपन्यांच्या ग्राहकांना सध्या त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तक्रार कोणाला करायची याची माहिती नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे, त्यामुळे नाममात्र अपवाद वगळता सर्वाकडे मोबाइल असतोच. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. मात्र, अलिकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासले आहेत. प्रत्येक मोबाइल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहीना काही तक्रार असल्याचे आढळून आले आहे.
मोबाईल नेटवर्क सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना मोफत इंटरनेटची चांगलीच सवय लावली असून ग्राहकांच्या इंटरनेटच्या मोबाईल बिल मधे कमालीची वाढ केलेली दिसून येते २४९ रू चा बील ७४९ रू झालेला असून ग्राहकांची कमालीची लूट मोबाईल नेटवर्क कंपन्या करीत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या महिन्याच्या बजेटवर याचा परिणाम झालेला दिसून येते आहे. तालुक्यातील मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी नेटवर्क आणि इंटरनेट समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.