विकेंडला पार्ट्या करणार्‍या 18 जणांवर कारवाई

गोंदिया: विकेंडला वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन पार्ट्या करणार्‍या वाहनचालकांवर गंगाझरी पोलिसांनी 2 एप्रिल रोजी दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई पांगडी व केरझरा या पर्यटनस्थळी करण्यात आली. यात 18 वाहनधारकांकडून 41 हजार 500 रुपयांचां दंड वसूल करण्यात आला.

शहराला लागून पांगडी व केरझरा या तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळी रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शहरवासी मोठ्या संख्येने सहल व पार्ट्याचा आनंद घेतात. यात युवावर्गाचा मोठा समावेश राहतो. मात्र यादरम्यान वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. परिणामी याठिकाणी विकेंड पार्ट्यादरम्यान मानवी अतिक्रमणाने वन्यजीव यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच अप्रिय घटना होण्याची शक्यता राहते. यावर नियंत्रण राहावे यासाठी वरिष्ठांच्या निर्देशानुसार गंगाझरी पोलिस पर्यटनस्थळी गस्त व कारवाई करीत आहेत. यातंर्गत 2 एप्रिल रोजी नियम न पाळणार्‍या, वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर व विषेशतः विना परवाना वाहन चालविणार्‍या वाहनावर कारवाई करण्यात आली. यात 18 वाहतूक कारवायात 41,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक टिळेकर, पोलिस हवालदार राकेश भुरे, मनोहर अंबुले, पोलिस शिपाई भूमिका बोपचे, तुलसीदास पारधी यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share