स्फोटके नेणार्या नक्षल सदस्याला अटक
देवरी◼️ नक्षलवाद्यांसाठी स्फोटके नेणार्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास पोलिसांना अटक केली आहे. किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (31) रा. खारकाडी, पो. हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. ही कारवाई पोलिसांनी नागनडोह जंगल परिसरात केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील नक्षलविरोधी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. यातंर्गत 31 मार्च रोजी जिल्हा पोलिस पथकाला केशोरी पोलिस ठाण्यातंर्गत भरनोलीजवळील नागनडोह जंगल परिसरातून एक इसम पोलिसांविरोधात घातपात घडविण्याच्या उद्देशाने स्फोटके व इतर साहित्य नक्षलवाद्यांना देण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागनडोह जंगलात सापळा रचून किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (31) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 डेटोनेटर, 1 जिलेटीन कांडी व साहित्य जप्त केले. किसन टिपागड दलमचा सक्रिय सदस्य असून, 2009 मध्ये नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांवर मरकेगाव, हत्तीगोटा येथे केलेल्या हल्ल्यात आणि 2011 मध्ये खोब्रामेंढा गोळीबार, मुरुमगाव येथील हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. पुढील तपास देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.