शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास अटक

चंद्रपूर◼️ आजोबांनी लिहून ठेवलेल्या मृत्यूपत्रानुसार शेतजमिनीचे फेरफार करण्याकरीता लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह कोतवालास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरूवार) अटक केली. त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याचे धनंजय लुमदेव बुराडे तर राहूल सिध्दार्थ सोनटक्के असे कोतवालाचे नाव आहे. शंकरपूर येथे बुराडे हे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर किटाळी येथे कोतवाल म्हणून कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चिमूर तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे आजोबाची डोंगरगाव येथे गट क्रमांक १५१/१ मध्ये ०.९० हे. आर शेतजमीनीचे मृत्यूपत्र तयार करून ठेवले होते. त्या शेतजमिनीचे आजोबांच्या मृत्यूपत्रानुसार फेरफार करून तक्रारदार यांचे नावावर शेतजमिन करून घ्यायची होती. या करीता शंकरपूर मंडळ कार्यालयाचे मंडळ अधिकारी धनंजय बुराडे यांनी तक्रारदाराकडे 7 हजाराची मागणी केली होती. तक्रारदारांची मंडळ अधिकाऱ्याला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराच्या मुलीच्या सल्‍ल्‍याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपर येथे तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीच्या अनुषंगाने, लाचलुपत विभागाने केलेल्या पडताळणीदरम्यान मंडळ अधिकारी धनंजय बुराडे यांनी लाचेची मागणी केली होती. तसेच किटाळी येथील कोतवाल राहूल सिध्दार्थ सोनटक्के याने मंडळ अधिकाऱ्याला लाच देण्याकरीता ५ हजारात तडजोड केल्याचे स्पष्ट झाल्याने (गुरूवारी) पोलिस स्टेशन भिसी येथे मंडळ अधिकारी व कोतवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक, मधुकर गिते, तसेच पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पो. नि. जितेंद्र गुरले तसेच सहकारी नापोकॉ. रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, पोकॉ. राकेश जांभुळकर, अमोल सिडाम व चापोको सतिश सिडाम यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share