6 वर्षाच्या बालकांनाच मिळणार शाळेत प्रवेश : नवीन शैक्षणिक धोरण लागू
केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश
मुंबई: केंद्र सरकारने शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांचे वय निश्चित केले आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळाच्या प्रवेशासाठी नवीन नियम लागू केला आहे. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. सहा वर्ष पूर्ण नसल्यास विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. केंद्र सरकारकडून (Central Govt) शैक्षणिक नियमांत हा मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठीचा मुलभूत टप्पा आहे.
देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीचे वय वेगवेगळे होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये लोकसभेत एका प्रश्नावर दिलेल्या माहितीनुसार, यामधील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलांच्या पहिली इयत्तेतील प्रवेशासाठी सहा वर्षे वय असण्याचा नियम लागू नव्हता. येथे मुलांना वयाची 6 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पहिली इयत्तेत प्रवेश घेण्याची परवानगी होती. गुजरात, तेलंगणा, लडाख, आसाम आणि पुद्दुचेरी ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे 5 वर्षांच्या मुलांनाही पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र आता सरकारने नवीन नियम लागू केला आहे.
लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये पहिली इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय पाच वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली होती. 28 मार्च 2022 रोजी, शिक्षण मंत्रालयाने लोकसभेत हा अहवाल सादर केला होता. त्यानुसार, विविध राज्यांतील प्रवेश प्रक्रिया ही राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नसल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमधील प्रवेशाचे नियम वेगवेगळे असल्याचं समोर आलं होतं.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण प्रक्रियेमध्ये विविध बदल, नवीन कामे आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता मुलांसाठी नवीन अभ्यास साहित्य प्रसिद्ध करण्यात आलं असून याला जादूई पिटारा म्हणजे जादूची पेटी असे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या जादूई पिटारा लाँच करण्यात आला. मात्र, सध्या जादूई पिटारा हा एलिमेंट्री लेवलच्या विद्यार्थ्यासाठी आहे. हा जादूची पेटी प्राथमिक स्तरावरील मुलांमध्ये अभ्यासाची आवड आणि कल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या बॉक्समध्ये मुलांसाठी खेळणी, बाहुल्या, मातृभाषेतील रंजक कथा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय खेळ, चित्रकला, नृत्य, संगीत यावर आधारित शिक्षणाचाही जादूच्या पेटीत समावेश करण्यात येणार आहे.