गोंदिया पोलिसांचा ‘पोलिस आपल्या दारी’ उपक्रम

गोंदिया: गुन्हे किंवा अन्य प्रकरणाची तक्रार करण्यासह पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. नोंदविण्यास होणारा विलंब टाळण्याच्या उद्देशाने गोंदिया पोलिस विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 29 ऑगस्टपासून ‘पोलिस आपल्या दारी’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या चार पोलिस ठाण्यात हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असून, यासाठी संबंधित पोलिस अंमलदारांना प्रशिक्षण व साहित्य देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रपरिषदेत दिली.

पोलिस अधीक्षक पानसरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले, पोलिसांचे प्रथम कर्तव्य हे गुन्ह्यास प्रतिबंध करणे व गुन्ह्यांचा तपास करून आरोपीविरुध्द सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये तपासाच्या ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाची बाब म्हणजे गुन्हा घडल्यानंतर त्याचा सी.आर.पी.सी कलम 154 प्रमाणे पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल करण्यात येतो. काही परिस्थितीमध्ये तक्रारदारांकडून एफ.आय.आर. नोंदविण्यामध्ये विलंब होतो. त्यामुळे गुन्ह्याच्या तपास उशीराने सुरुवात होते. परिणामी पुरावा नष्ट किंवा पुराव्यात फेरफार होण्याची दाट शक्यता असते. याचा फायदा सुनावणीवेळी आरोपी पक्षास होऊन आरोपी निर्दोष सुटतो. ही बाब टाळता यावी व पोलिसांच्या कामकाजात गतिमानता आणण्याच्या उद्देशाने ‘पोलिस आपल्या दारी’ हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाचा प्रामुख्याने जेष्ठ नागरिक, शारीरिक कारणाने आजारी असणारे, अतिप्रसंगी झालेल्या पीडित, पोक्सोच्या गुन्हयातील पीडित, गंभीर जखमी अशा तक्रारदारांचे एफ. आय. आर. नोंदविण्यातील विनाविलंब नोंदविता येतील. या उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा पोलिस दलाला प्राप्त निधीतून 37 लॅपटॉप्स व 21 प्रिंटर्स खरेदी केलेले असून पोलिस अधिकारी व अंमलदार हे त्यांना पुरविण्यात आलेले आहेत. गुन्हा किंवा घटना घडल्यावर संबंधित अंमलदार लॅपटॉप व प्रिंटरसह तक्रारदारांकडे जातील व तक्रार नोंदवून त्याची सत्यप्रत तक्रारदारास देऊन एफआयआर नोंदवून त्याची स्वाक्षरी घेतील. तसेच एफआयआरची प्रती ई- मेलव्दारे किंवा व्हॉटसअपव्दारे पुन्हा तक्रारदाराकडे गेलेल्या पोलीस अधिकार्‍यांकडे पाठवतील. या उपक्रमामुळे भविष्यात एफ.आय.आर. नोंदविण्यातील विलंब टाळला जाईल. तसेच पोलिसांच्या कामकाजात गतिमानता येऊन जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना, नागरीकांचा पोलीसांवरील विश्वास दृढ होईल. सद्यस्थितीत प्रायोगिक तत्वावर गोंदिया शहर, आमगाव, अर्जुनी मोर व रावणवाडी पोलिस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Share