नागपूर : गुजरातमधून आणलेले 3 हजार टन प्लॅस्टिक जप्त

नागपूर : गुप्त माहितीच्या आधारे महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने घातलेल्या धाडीत आज गुजरात येथून आणलेले सुमारे तीन हजार टन प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले. उपद्रव शोध पथकाने आतापर्यंत एका दिवसात केलेली ही मोठी कारवाई आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी १० प्रतिष्ठानांवर कारवाई करून ७ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे एनडीएस पथक प्रमुख वीरसेन तांबे आणि त्यांच्या पथकाने स्माल फॅक्टरी एरिया, लकडगंज आणि मौरानीपूर ट्रान्स्पोर्ट कंपनीविरोधात कारवाई करून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोनअंतर्गत कॉटन मार्केट येथील जय दुर्गा इन्टरप्राईजेस या दुकानाविरुध्द कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केले.
गांधीबाग झोनमध्ये इतवारी येथील मोर्डन टेक्स्टाईल्स, सतरंजीपूरा झोनमधील विणकर कॉलनी, तांडापेठ येथील घाटाखाये अगरबत्ती यांच्याविरुद्ध प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल व्यापारी संजय जांगीड, वेदप्रकाश पांडे, दादू भाई, श्याम भाई यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. कारवाईअंतर्गत एकूण २ हजार ९४८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. पथकाने जप्त केलेले प्लॅस्टिक भावनगर गुजरात येथून आले होते.
नरेंद्रनगर येथील आत्मानंद गोडबोले यांनी स्वत:च्या खुल्या भूखंडावर झाडांचा कचरा पसरविल्याबद्दल त्यांच्याकडून ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. खरबी रोड येथील दिनेश मिष्ठान्न भंडार आणि नटरंग बार ॲण्ड रेस्टॉरेन्टच्या मालकावर कचरा पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशिनगर झोनमध्ये वैशालीनगर येथील बजरंग बली कन्स्ट्रक्शनवर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल हजार १० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनमध्ये श्याम ऑप्टीकल्सवर पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. झिंगाबाई टाकळीत अतिक्रमण करणाऱ्यावर ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share