पाच हजाराची लाच घेताना अव्वल कारकून सापळ्यात
सांगली : शेत जमिनीवर असलेला तबदिलीस मनाई हा शेरा कमी करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना भूसंपादन अव्वल कारकून चारुदत्त शंकरराव गावडे (वय 57) रंगेहाथ सापडला. लाचलुचपत प्रतिबंधकच्या सांगली विभागाने कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली. तक्रारदार व्यक्तीने आपल्या शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या तबदिलीस मनाई हा शेरा कमी करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र 6 यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यांच्या अर्जानुसार कार्यवाही करण्यासाठी त्या कार्यालयातील अव्वल कारकून चारुदत्त गावडे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार व्यक्तीने १० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधकच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली. या पडताळणी गावडे याने तक्रारदार व्यक्तीच्या शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या तबदिलीस मनाई हा शेरा कमी करुन देण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाच्या कार्यालयातच गावडे हा लाचेची रक्कम स्विकारणार असल्याची माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधकने त्या ठिकाणी सापळा लावला. यावेळी गावडे हा लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ जाळ्यात सापडला. या कारवाईनंतर चारूदत्त शंकरराव गावडे यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीसांत लाचलुचपत प्रतिबंधक अधनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.