उपचाराअभावी दीड महिन्याच्या मुलाचा मृत्यू
आमगाव: आमगाव तालुक्यातील कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य द्वार रात्रीच्या वेळेस कुलुपबंद असल्यामुळे उपचाराअभावी एका दीड महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना 31 मे रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान संबधित अधिकारी व कर्मचार्यावर कार्यवाही करण्याची मागणी कुटूंबिय आणि गावकर्यांनी केली आहे.
तालुक्यातील कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री 12 वाजताच्या सुमारास कायरव विकास नांदणे या दीड महिन्याच्या मुलाला प्रकृती बरी नसल्याने कुटूंबियांनी उपचारासाठी आणले होते. मात्र प्राथमिक केंद्राच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते. कुटूंबियांनी दरवाजाबाहेरून आत असलेल्या कर्मचार्यांना एक ते दीड तासापर्यंत आवाज दिला. मात्र कुणीही आले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात कार्यरत कर्मचारी व डॉक्टरांचे घर गाठले. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाला असता बाळाचा मृत्यू झालेला होता. रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोपी नांदणे कुटूंब व नागरिकांनी केला असून वरिष्ठांनी याप्रकरणी चौकशी करुन संबंधित दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.