15 हजाराची लाच घेताना ‘महावितरण’चा सहाय्यक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
कोल्हापूर : केलेल्या कामाची बिले मंजूर करण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन ती स्विकारताना महावितरण (MSEDCL) कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई ताराबाई पार्क येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात केली. धर्मराज विलास काशीदकर (वय-40) असे या अभियंत्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने महावितरण ग्रामीण विभाग 2 अंतर्गत ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगची कामे केली होती. या कामाची बिले मंजूर ) करण्यासाठी ते धर्मराज काशीदकर यांच्याकडे गेले होते. यावेळी काशीदकर याने तक्रारदाराकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार याने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यानंतर कोल्हापूर एसीबीने आज (बुधवार) ताराबाई पार्क येथील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात सापळा रचून आरोपी धर्मराज काशीदकर याला तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे , अप्पर अधीक्षक सुरज गुरव
अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार , सहायक फौजदार संजीव बंबर्गेकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, कॉन्स्टेबल मयूर देसाई, रुपेश माने यांनी केली.