27 फेब्रुवारीला पोलिओ लसीकरण मोहिम

◾️1 लाख 9 हजार 202 बालकांना मिळणार पोलिओ डोज

गोंदिया 26 : जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील 1,09,202 लाभार्थ्यांना 27 फेब्रुवारी 2022 रोजी पोलिओ डोज दिला जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 92007 तर शहरी भागातील 17195 लाभार्थी असणार आहेत. यासाठी 1 लाख 40 हजार डोजेस लागणार असून सदर लस प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्ह्यातील शीतसाखळी वाहनाद्वारे प्रत्यक्ष पोहोचविण्यात आलेली आहे. ग्रामीण भागासाठी-1295 तर शहरी भागासाठी-119 अशा एकूण 1414 लसीकरण बुथवर पोलिओचे डोज दिले जाणार आहे.

या मोहिमेमध्ये बायव्हायलंट लसीचा वापर करण्यात येणार आहे.मोहिमेच्या दिवशी बुथवर व त्यानंतर सुटलेल्या लाभार्थ्यांना घरभेटीद्वारे (आयपीपीआय) ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, टोलनाके, विमानतळ येथे लाभार्थ्यांचे प्रवासाच्या दरम्यान ये-जा असते अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार ट्रांझिट टिमचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 56 टीम काम करणार असून ग्रामीण भागात 50 तर शहरी भागात 6 टीम राहतील. तसेच जिल्ह्यात ज्या ठिकाणी तुरळक लाभार्थी असण्याची शक्यता असते त्या ठिकाणी मोबाईल टिमचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकूण 26 मोबाईल टिम काम करणार असून ग्रामीण भागात 24 टिम व शहरी भागात 2 टिम काम करणार आहेत.

जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता, बुथ व आयपीपीआय दरम्यान कोविड वर्तणूक बदल जसे- नियमीत मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व बुथवर गर्दी न करता दोन व्यक्तीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवणे या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share