महिला पोलीसाची कौटुंबिक वादातून विषप्राशन करुन आत्महत्या

कौटुंबिक वादातून जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसाने विषप्राशन करुन आत्महत्या केली. प्रणाली काटकर (३५)असे त्‍यांचे नाव आहे.

प्रणाली काटकर या सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथील मूळ रहिवासी आहेत. मागील सात-आठ वर्षांपासून त्‍या गडचिरोली पोलिस दलात कार्यरत होत्‍या. दोन वर्षांपूर्वी पोलीस शिपाई संदीप पराते यांच्याशी त्‍यांचा विवाह झाला होता. दोघेही पोलिस मुख्यालयाजवळील पोलिस कर्मचारी वसाहतीत राहत होते.

प्रणाली व संदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. काल रात्री त्यांचा पुन्हा वाद झाल्यानंतर तो विकोपाला गेला. प्रणाली यांनी विषप्राशन केले. त्यानंतर पती संदीप यांनी त्‍यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्‍यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी दिली.

Share