नागपूरच्या मालविकाने सायनाला नेहवालला दिला पराभवाचा धक्का
नवी दिल्ली : २० वर्षीय मालविका बनसोडने गुरुवारी (१३ जानेवारी) बॅडमिंटन विश्वात मोठ्या उलटफेराची नोंद केली आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती भारताची पहिली फुलराणी सायना नेहवाल प्रदीर्घ कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टवर परतली होती, पण तिचा प्रवास लवकरच संपुष्टात आला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या २० वर्षीय मालविका बनसोडने सायनाचा पराभव केला. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या या सामन्यात मालविकाने सायनाला २१-१७, २१-९ असा सलग सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. हा सामना फक्त ३४ मिनिटे चालला. सायना सध्या जागतिक क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर, तर मालविका १११ व्या क्रमांकावर आहे.
सायनाचा वर्षातील पहिल्या बॅडमिंटन स्पर्धेतील प्रवास दुसऱ्या फेरीतच थांबला आहे. दुसरीकडे भारताची आणखी एक स्टार शटलर पी.व्ही. सिंधूनेही विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला आहे. तिने इरा शर्माविरुद्धचा दुसऱ्या फेरीचा सामना २१-१०, २१-१० असा जिंकला. तसेच अश्मिता चलिहा हिनेही दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला आहे. आता तिसऱ्या फेरीत अश्मिताचा सामना सिंधूशी होणार आहे.
पी.व्ही.सिंधूने सायनाला याआधी पराभूत केले होते. सिंधू ही पहिली तर मालविका ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे, ज्यांनी सायनाला महत्वाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभूत केले आहे. सायनाला पहिल्या फेरीत झेक प्रजासत्ताकची तेरेझा स्वाबिकोवा हिला दुखापत झाल्यामुळे थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला होता.
पहिल्या गेममध्ये ४-४ अशा बरोबरीनंतर आघाडी
पहिल्या गेमच्या सुरुवातीला सायना आणि मालविका यांच्यात बरोबरी होती. एकवेळ दोन्ही खेळाडू ४-४ असे बरोबरीत होत्या. त्यानंतर मालविकाने आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राखली. दुसऱ्या गेममध्येही दोघेही २-२ अशा बरोबरीत होत्या. त्यानंतर मालविकाने आपला वेग वाढवला आणि सामना जिंकेपर्यंत तिने मागे वळून पाहिले नाही.