जिल्ह्यात लसीकरणात गोंदिया तालुका आहे आघाडीवर
१.१० लाख नागरिकांचे लसीकरण : मोहिमेला वेग
गोंदिया : लसीकरणाची मोहीम जोमात सुरू असून जिल्ह्यातील ५,८८,८९० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात सर्वच तालुक्यांची कामगिरी चांगली दिसत असून, यामुळेच जिल्ह्याचे नाव अग्रस्थानी आहे. विशेष म्हणजे, लसीकरणात जिल्ह्यात हॉटस्पॉट गोंदिया तालुका आघाडीवर असून, आतापर्यंत तालुक्यातील १,१०,५११ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ९०,०३३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २०,४७८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातील लसीकरणाबाबत नागरिकांत मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्यामुळे लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद दिसून आला नाही. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला व यापासून जिल्हाही सुटू शकला नाही. अशात आता कोरोनाला हरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले. यानंतर आता शासन लसीकरणावर जोर देत असून, लसीकरणाची चळवळच सुरू करण्यात आली आहे.
लसीकरणाच्या या चळवळीत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून, राज्यातच अग्रस्थानी असल्याची नोंद घेण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील यंत्रणांची मेहनत फलिताला आली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मात्र, गोंदिया तालुका कोरोनात हॉटस्पॉट ठरला असतानाच आता सर्वाधिक लसीकरण करणारा तालुकाही ठरला आहे.
आतापर्यंत तालुक्यातील १,१०,५११ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ९०,०३३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २०,४७८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर
– लसीकरणात अर्जुनी-मोरगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून येथे ६४,६१८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ४७,७६६ नागरिकांनी पहिला, तर १६,८५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून, येथे ६१,८८४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५३,५७६ नागरिकांनी पहिला तर ८,३०८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
सालेकसा तालुका अद्यापही पिछाडीवरच
– लसीकरणात सर्वच तालुक्यांची मेहनत सुरू असतानाच मात्र सुरुवातीपासूनच सालेकसा तालुका माघारी दिसून येत आहे. सालेकसा तालुक्यात सर्वांत कमी ४१,८१७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ३३,१२१ नागरिकांनी पहिला, तर ८,६९६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अन्य सर्वच तालुक्यांत ५० हजारवर आकडा पार झाला आहे.