टीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था )– करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजवला. अचानक रुग्णसंख्येचा महास्फोट झाल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली. अनेक ठिकाणी हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन, रेमडीसीव्हीर अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंमुळे तर अवघा देश हळहळला होता.

मात्र राज्य सरकारांनी ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूची कोणतीही आकडेवारी केंद्र सरकारला पुरवली नसल्याने देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचे केंद्र सरकारतर्फे संसदेत सांगण्यात आले होते.

यानंतर केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. ऑक्सिजन बेड्स उपपलब्ध न झाल्याने आपल्या नातेवाईकांचा तडफडून मृत्यू झालेल्या नागरिकांनीही याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला होता. यानंतर आता केंद्र सरकारला खडबडून जाग आली असून केंद्राने राज्य सरकारांना ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची आकडेवारी सादर करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत.

याबाबतची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिली असून यानुसार, केंद्र सरकारतर्फे राज्यांना ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूचा आकडा सादर करण्याची सूचना केली आहे. राज्यांकडून जमा झालेली आकडेवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सादर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email
Share