तलाठ्यासह कोतवाल व खाजगी व्यक्ती अडकला एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधनी / तारसा 29: शेतजमीनीच्या फेरफार नोंदणी करण्यासाठी ७ हजारांची लाच स्विकारतांना तारसा ता.मौदा जि. नागपूर येथील तलाठी संजय भगवान पडवार (३१), कोतवाल किशोर बिसन वानखेडे (५२) आणि खाजगी व्यक्ती लक्ष्मीनारायन रामचंद्र पोटभरे (४१) यांना लाप्रवि पथकाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहीतीनुसार, यातील तक्रारदार हे वैद्यकीय व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी माहे जुन २०२१ मध्ये तारसा, ता.मौदा जि. नागपूर येथे शेतजमीन खरेदी केली असून त्याबाबत फेरफार नोंदणी करण्यासाठी तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रासह तलाठी कार्यालय तारसा येथील तलाठी संजय भगवान पडवार यांची भेट घेवून शेतजमीन फेरफार नोंदणीकरिता अर्ज केला. त्यानंतर २८ जून २०२१ रोजी तलाठी संजय पडवार यांनी तक्रारदार यांना फोन करून शेतजमीनचे फेरफार करण्यासाठी ७ ते ८ हजार रूपये खर्च लागेल असे सांगुन लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना तलाठी संजय पडवार यांन कोणतीही लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि भंडारा येथे तक्रार दाखल केली.
लाप्रवि भंडारा येथील पोलीस उपअधिक्षक महेश चाटे, यांनी दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारावाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी दरम्यान तलाठी संजय पडवार व कोतवाल किशोर वानखेडे यांनी तक्रारदारा तारसा येथे खरेदी केलेल्या शेतजमीनीचे फेरफार नोंदणी करण्यासाठी ७ हजारांच्या लाचेची मागणी करून खाजगी व्यक्ती लक्ष्मीनारायण पोटभरे यांच्या मार्फतीने तहसिल कार्यालय मौदा येथे लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना लाप्रवि भंडारा पथकाने आज २९ जून रोजी रंगेहाथ पकडले. त्यावरून त्यांच्याविरूध्दा पोलीस स्टेशन मौदा येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारावाई लाप्रवि नागपूरच्या पोलीस अधीक्षीका श्रीमती रश्मि नांदेडकर, अपर पोली अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक महेश चाटे, योगेश्वर पारधी, पोहवा संजय कुरंजेकर, नापोशि रोशन गजभिये, राजेंद्र करूडकर, कोमल बनकर, पोशि सुनिल हुकरे, कुनाल कडव, दिनेश धार्मीक यांनी केली आहे.

Share