96 गावांना पुराचा धोका : मान्सूनपूर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करा, जिल्हाधिकारी खवले यांचे निर्देश
गोंदिया, दि.7 : मान्सून कालावधीत जिल्ह्यातील 96 पूरप्रवण गावांना पुराचा धोका आहे. मागील वर्षी 2020 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये. तसेच धरण, जलाशय इत्यादी ठिकाणी यावर्षी पाण्याचा साठा जास्त असल्यामुळे सर्व संबंधित विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर यांच्यामार्फत आयोजित प्रात्यक्षित कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रम कटंगी जलाशय गोरेगाव येथे आयोजित करण्यात आले होते.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, गोरेगावचे तहसीलदार सचिन गोसावी, SDRF नागपूरचे पोलीस उपअधीक्षक सुरेश कराळे, पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे, नायब तहसीलदार नरेश वेदी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रात्यक्षिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी खवले म्हणाले, जलसंपदा व महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वय ठेऊन कार्य करणे गरजेचे आहे. तसेच धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन गावातील नागरिकांना पूर्वसूचना देऊन पाणी सोडून नदीच्या पातळीची सूचना संबंधित विभागांनी देणे आवश्यक आहे. अचानक उदभवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सर्व उपस्थितांना दिल्या.
जिल्हयात सरासरी 1327.49 मि.मी पाऊस पडतो. तसेच गोंदिया जिल्हयाच्या बाजूला मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या सीमा लागून आहे. बालाघाट आणि राजनांदगाव जिल्हयात पडणारा पाऊस संजय सरोवर तथा शिरपूर धरणाच्या माध्यमातून जिल्हयात प्रवेश करतो. तसेच संजय सरोवर (मध्यप्रदेश) येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 25 तासात वैनगांगा नदीच्या माध्यमातून बिरसोला संगम घाट (काटी) महाराष्ट्र येथे पोहोचतो. तसेच शिरपूर देवरी येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 27 तासात बाघनदीच्या माध्यमातून रजेगांव घाटपर्यंत पोहोचतो. या दरम्यान धरणातून सोडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी खवले यांनी दिली.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्हा शोध व बचाव दलातील सदस्यांना प्रात्यक्षिकाचे लाभ घेवून पूर परिस्थितीवर मात करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विभाग प्रमुखांनी 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावे. तसेच वाट्सअप ग्रुप तयार करुन पूरपरिस्थितीच्या सूचना नागरिकांना देणे. पूर परिस्थितीच्या वेळेस टाकाऊ वस्तुंचा प्रयोग करुन आपत्तीवर मात करण्यासाठी जनजागृती करावी, असे ते म्हणाले. आपत्तीचे पूर्वनियोजन महत्वाचे असून जिल्हयातील 96 गावांमध्ये पूर परिस्थतीचे संभाव्य धोके आहेत. मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाययोजना करण्यासंबंधी पोलीस दल सज्ज असून 24 तास कार्यरत आहे, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
पोलीस उपअधीक्षक सुरेश कराळे यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकाची माहिती देऊन घरगुती टाकाऊ वस्तुपासून तयार करण्यात आलेल्या साहित्यांपासून फ्लोटींग डिवाईस तयार करुन पाण्यात त्यांचे प्रयोग दाखविले. रंगीत तालिमेकरिता गोरेगाव तालुक्यातील कटंगी जलाशय येथे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पाण्यात रबर बोट व इंजिनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शोध व बचाव करताना पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचे शोधकार्य, पाण्याच्या प्रवाहात बोटीचे प्रयोग इत्यादीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रयोग करुन दाखविण्यात आले.
कार्यक्रमास यादव फरकुंडे, इंद्रकुमार बिसेन, चुन्नीलाल मुटकुरे, चिंतामन गिऱ्हेपुंजे, गिरधारीलाल पतैहे, जबराम चिखलोंडे, जितेन्द्र गौर, नरेश उके, राजकुमार बोपचे, जसवंत राहांगडाले, रवि भांडारकर, संदिप कराळे, दिनू दिप, राजकुमार खोटेले, सुरेश पटले, राजेंद्र अंबादे, शर्मानंद शहारे, गजेन्द्र पटले, मुकेश ठाकरे, समित बिसेन, राजेन्द्र शेंडे, अंश चौरसिया, विशाल फुंडे, राहुल मेश्राम, शहबाज सैय्यद, सुमित बिसेन, आदित्य भाजीपाले, अरविंद बिलोन, अजय राहांगडाले, विकास बिजेवार, मंडळ अधिकारी बी.एन.वरखडे, डी.एम.मेश्राम, कटंगी सरपंच तेजेन्द्र हरिणखेडे, अंबादे, बांते, कावडे, गायधने तसेच SDRF व SRPF चे अधिकारी-कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.