IPL 2021 ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.

आयपीएलचे 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. यंदा मात्र आयपीएलचे सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज विशेष कार्यकारिणीचं आयोजन केलं होतं. या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने कधी होणार? याची उत्सुकता होती. अखेर BCCI ने हे सामने यूएईला होणार असल्याचं स्पष्ट केलं. बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

टी-20 विश्वचषकाचं काय?

यंदाचा टी-20 विश्वचषक भारतात आयोजित करण्याचं नियोजन आहे. मात्र भारतात वाढत्या कोरोना संकटामुळे विश्वचषक भारतात घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान याबाबतचा निर्णय करण्यासाठी 1 जून रोजी बैठक होणार असून त्या बैठकीतच विश्वचषकाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. विश्वचषक भारतात घेण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे.

परदेशी खेळाडूंचा मुद्दा महत्त्वाचा

संपूर्ण आयपीएलच्या नियोजनात परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे. सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये सुरक्षितपणे घेऊन जाण्याच्या मुद्यावर अधिक चर्चा झाली. त्यातच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांची काय भूमिका आहे, यावरही चर्चा झाली.

Print Friendly, PDF & Email
Share