Breaking: पिवळ्या लाईनबाहेर असाल तर टोल भरु नका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची सूचना!
पुणे | आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असाल आणि महामार्गावरील टोल नाक्यावर होत असलेल्या गर्दीला कंटाळला असाल तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता टोल नाक्यावर लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी 100 मीटर अंतरावर पिवळी पट्टी आखणं बंधनकारक केलं आहे.
टोल नाक्यावर लांबच लांब रांगा लागू नये आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी 100 मीटरच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या तर 100 मीटरच्या आतील सर्व वाहने टोल न भरताच पुढे सोडण्यात येतील, असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल नाक्यावर गर्दीच्या वेळीही प्रत्येक वाहनाला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सध्या अनेक टोलनाक्यांवर फास्टॅग बंधनकारक करण्यात आल्यामुळे वाहनांच्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. फास्टॅग वापरामुळे कॅशलेस व्यवहार आणि लांबच लांब रांगांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
टोल नाक्यावर आता 100 मीटरच्या आत पिवळी रेषा आखून त्या रेषेच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या तर पिवळ्या रेषेच्या आतील सर्व वाहने मोफत सोडण्यात याव्या, अशा संदर्भातील आदेश जारी केले आहे. त्यामुळे आता पिवळा लाईनच्या बाहेर असणाऱ्या वाहनांना आपला वेळ वाचवता येणार आहे. त्याबरोबरच लांबच लांब रांगा लागल्यामुळे काही वाहनचालकांना पैसे न भरताच टोल प्लाझावरून पुढे जाता येणार आहे.