देवरीतील अवैध गौणखनिज तस्करांवर तब्बल 92 लाख 65 हजार 800 रु.दंड

तहसीलदार विजय बोरुडे यांची मोठी व बेधडक कार्यवाही

देवरी,दि.27- देवरी तालुक्यात गाजत असलेल्या अवैध गौण खनिज प्रकरणात देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी धडक कार्यवाही करीत काल (दि.26) चार धाडी टाकून केलेल्या कार्यवाहीत 92 लाख 56 हजार 800 रूपये दंड ठोठावला आहे. परिणामी, देवरी तालुक्यातील गौण खनिज तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

तहसीलदार विजय बोरुडे कार्यवाही करतांना

पहिले प्रकरण मौजा नवाटोला भर्रेगाव येथील गोंडवाना वे ब्रीज येथील असून धर्मकाट्यासमोरिल पटांगणावर 10 ब्रास बोल्डर विनापरवानगीने साठा करून ठेवल्याचे तालुका प्रशासनाच्या लक्षात आले. या प्रकरणी गैरअर्जदार झामसिंग येरणे रा. देवरी यांचेकडून एकूण 1 लाख 54 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दुसरे प्रकरणी देवरीच्या छत्रपती शाळेच्या मागील पटांगणावरील असून येथे 30 ब्रास रेती साठा करून ठेवल्याचे दिसून आल्याने अनिल झामसिंग येरणे यांचेवर 7 लाख 62 हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तिसरे प्रकरण बोरगाव बाजार येथील असून राधारमण अग्रवाल रा. डव्वा यांनी ज्ञानेश्वर झाडू ठाकरे यांचे डागेवर 70 टिप्पर( 420 ब्रास) रेती, 60 ब्रास बोल्डर अवैधरीत्या साठवून ठेवले होते. यामध्ये राधारमण अग्रवाल यांचेवर रेतीसाठी 61 लाख 46 हजार 800 आणि बोल्डरसाठी 9 लाख 24 हजार असा एकूण 70 लाख 70 हजार 800 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

चौथे प्रकरण देवरी औद्योगिक वसाहतीमधील असून देवरीचे मनीष अग्रवाल यांनी अवैधरीत्या 50 ब्रास रेतीचा साठा करून ठेवल्याचे चौकशीत आढळून आले. यामध्ये बाजारभाव मूल्याच्या 5 पट असे एकूण 12 लाख 70 हजार रुपयांचे दंड ठोठावण्यात आले आहे.

या चारही प्रकरणात तहसीलदार विजय बोरुडे यांनी धडक कार्यवाही करीत 92 लाख 56 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तालुका प्रशासनाच्या या कार्यवाही मुळे तालुक्यातील गौण खनिज तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share