उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटलांना शिकवलेल्या शिक्षिकेची आर्त हाक!

मुंबई : तौक्ते वादळामुळे राज्यातील किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं. यामध्ये कोकणासह मुंबई उपनगरातील काही भागात वादळाचा फटका बसला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री जयंत पाटील यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचंही नुकसान झालं आहे. सुमन रणदिवे वसईतील या वृद्धाश्रमात आहेत. वादळात या वृद्धाश्रमाचं नुकसान झाल्याने 90 वर्षाच्या सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं आहे. छप्पर उडालं, सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवलं होतं. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर, अशी आर्त हाक शिक्षिका सुमन यांनी त्यांच्या मुख्यमंत्री विद्यार्थ्याला लगावली आहे.सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. शाळेमध्ये त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. सुमन रणदिवे 1991 मध्ये निवृत्त झाल्या आहेत. पावसाच्या तोंडावर वृद्धश्रमाची डागडुजी करणं अत्यंत गरजेचं आहे. वृद्धाश्रमाचा पहिला मजला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे तळमजल्यावर सर्व वृद्ध राहात आहेत.

दरम्यान, आतापर्यंत 10 ते 12 लाखांचं नुकसान झालं आहे. मात्र मोठी धाकधूक ही आहे की जर पावसाळ्यापूर्वी जर हे ठिक झालं नाही, तर वृद्धांना पाण्यात राहावं लागणार असल्याचं वृद्धाश्रम चालकांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मदत करतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share