खाद्यतेलामुळे खिशाला कात्री, वर्षभरात किंमत झाली दुप्पट

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने देशातील नागरिक आधीच त्रस्त आहेत. अनेक भागात पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. मुंबईतही पेट्रोलचा दर प्रति लिटर ९९.१४ रुपये आहे. त्यातच आता खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला ऐन कोरोना महामारीत्या काळात चांगलीच कात्री लागली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतींची चर्चा सर्वत्र होत असते. पण वाढत्या किंमतीच्या बाबतीत मोहरीच्या तेलाने पेट्रोल-डिझेललाही मागे टाकले आहे. गेल्या एक वर्षात मोहरी तेलाच्या दरात जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. खाद्यतेलामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करणाऱ्यांची संख्या देशात सर्वात जास्त आहे. मोहरी तेलाचे दर १८० ते १९५ रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहोचले आहेत. ज्या घरात दरमहा पाच लिटर तेल वापरले जाते त्या घरी दोन ते तीन लिटर तेल वापरण्यास सुरवात झाली आहे.

कोरोना महामारीत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर अनेकजण गावी परतले आहेत. लॉकडाउनच्या काळातच महागाई वाढत चालली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. गेल्या १४ दिवसात मोहरी तेलाच्या दरात १५ रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. लोकांना घरगुती खर्च भागविणेही कठीण जात आहे. 

खाद्यतेलांच्या किंमती गेल्या तीन महिन्यांत ३५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. १५ किलो मोहरीच्या तेलाची किंमत २००० रुपयांवरून २७०० रुपयांपर्यंत वाढली आहे. काश्मिरमध्ये स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या पीर, पी-मार्क आणि व्ही-ब्रँडसह लोकप्रिय मोहरीचे तेल प्रति १५ किलोसाठी २७०० रुपये आकारले जात आहेत.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मे २०२० मधील किंमतींच्या तुलनेत खाद्य तेलाच्या किंमती प्रति १५ किलोमागे सुमारे १००० रुपयांनी वाढल्या आहेत. गेले वर्षभर तेलाच्या किंमती वाढत आहेत. आणि त्या कमी होतील, अशी कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. गेल्या वर्षी ६० रुपये प्रति लिटर असणारे मोहरीचे तेल यंदा १९० रुपयांवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये जोरदार तेजी आली आहे. त्याचा प्रभाव भारतीय बाजारपेठेवरही जाणवून येत आहे. मोहरीबरोबर सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, वनस्पती तूप (डालडा) आणि रिफाइंड तेलाच्या किंमतीत बरीच वाढ झाली आहे. 

मे २०२० मधील दर (प्रति लीटर)

मोहरी – १२० ते १३० रुपये 

सोयाबीन – १२० रुपये

सूर्यफूल – १३२ रुपये

वनस्पती तूप – १०० रुपये

मे २०२१ मधील दर (प्रति लीटर)

मोहरी – १८० ते १९५ रुपये

सोयाबीन – १६० रुपये 

सूर्यफूल – २०० रुपये 

वनस्पती तूप – १४० रुपये 

गेल्या वर्षी लॉकडाउनच्या आधी भुसार बाजारात मोहरी तेलाचे दर ८५ ते ९५ रुपये प्रति लीटर होते. यात वर्षभरात ९५ रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच तेलाच्या किंमतीत दुप्पटीने वाढ झाली आहे. मार्चमध्ये मोहरीचे तेल १४० रुपये प्रतिलीटर होते. एप्रिलमध्ये १६० ते १७० वर पोहोचले. त्यानंतर आता मे महिन्यात तेलाचे दर १८० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. 

दिवसेंदिवस महागाई वाढू लागल्याने सामान्य जनता अस्वस्थ झाली आहे. मध्यमवर्गीय सर्वाधिक त्रस्त आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत लवकर ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Share