बोगस पत्रकाराची पोलखोल, या पध्दतीने झाला पर्दाफाश; जाणून घ्या प्रकरण

Pune: A bogus journalist was exposed in this manner in Pune; Learn the case

प्रहार टाईम्स वृत्तसंस्था

पुणे : पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधले जाते. पत्रकार शासन आणि प्रशासनाचा खरा चेहरा जनतेसमोर मांडत असतात. लोकशाही प्रधान देशामध्ये पत्रकारांना महत्वाचे स्थान असून समाजातील प्रत्येक घटकातील लोकांसोबत थेट संपर्क येत असतो परंतु सध्या ज्यांना धड बोलता लिहता येत नाही असेही लोक नावासमोर पत्रकार लिहून वाहनांवर प्रेस लिहून आपला धाक आणि रुबाब दाखवीत फिरत असतात. लावू का बातमी ? असा धाक दाखवत कित्तेक लोकांचा आर्थिक आणि मानसिक शोषण करीत असल्याचे शेकडो प्रकरणे दररोज समोर येत आहेत. असाच एका बोगस पत्रकाराने पुणे पोलिसांवर आपला डाव अजमावला आणि पोलिसांनी त्याला चांगलाच उधळले.

सविस्तर वृत्त असे , नाकाबंदीत कार अडविल्यानंतर पिंपरीच्या तोतया पत्रकार आणि त्याच्या साथीदाराने राडा घालत सहाय्यक निरीक्षक व त्यांच्या सहकार्‍यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. खडक परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी श्रीराम अशोकसिंग परदेशी (वय 36) आणि जतीन कुंदन परदेशी (वय 21, रा. दोघेही, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खडक पोलीस नेमणुकीस आहेत. त्यांना फडगेट पोलीस चौकीत कार्यरत असतात. ते फडगेट चौकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करत होते. यावेळी त्यांच्या मदतीला एसपीओ देखील होते. दरम्यान, एक कार आडविण्यात आली. त्यात क्षमतेपेक्षा अधिक लोक होते. त्यामुळे त्यांना विचारपूस केली गेली. यावेळी एकाने मी पत्रकार आहे, असे एसपीओना सांगितले. त्यामुळे गोसावी हे त्यांना बोलण्यास आले. त्यांनी कार्ड देखील दाखवले व अंत्यविधीच्या कार्याला जात असल्याचे कारण सांगितले. यामुळे गोसावी यांनी त्यांना सोडले. पण, कार पुढे नेल्यानंतर उभा करत एकाने गोसावी यांना येऊन या एसपीओना गाडी अडविण्याचा काय अधिकार आहे, असे विचारत वाद घालण्यास सुरवात केली. तसेच, हा वाद सुरू असताना एक जण त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करू लागला. यावेळी त्यांना पोलीस समजावत असताना त्याने “मी पत्रकार आहे, तुम्ही मला अडवू शकत नाही, तुम्ही कसली कारवाई करता मीच तुमच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करतो” असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला. तर पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोसावी यांचा हात झटकून देत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मग, पोलिसांनी तो कोणत्या वृत्तपत्राचा पत्रकार आहे याची शहानिशा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याच्याकडे असलेले ओळखपत्र (ID-Card) बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

Share