देवरी : आदिवासी क्षेत्राच्या मातीतून साहित्याची पालवी फुलवत आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांना शब्दबद्ध करणारे कवी सुदर्शन एम.लांडेकर यांनी महाराष्ट्र पोलीस विभागाच्या कर्तव्यनिष्ठेला अनोख्या काव्यरूपातून मानवंदना दिली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कवी सुदर्शन एम.लांडेकर यांनी “कर्तव्याची सावली” ही कविता महाराष्ट्र पोलीस विभागाच्या कार्याला अनुसरून रचली. समाजाच्या सुरक्षिततेसाठी ऊन-पाऊस, दिवस-रात्र यांची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या सेवेला या कवितेतून भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे.
कवी सुदर्शन एम.लांडेकर हे आपल्या आदिवासी क्षेत्रातून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. सन २०२० मध्ये राष्ट्रीय स्तरावरील कवी संमेलनात सहभागी होत त्यांनी गोंदिया जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातली होती. विविध सामाजिक आणि समकालीन विषयांवर सातत्याने कविता लेखन करणाऱ्या सुदर्शन एम.लांडेकर यांच्या लेखणीतून दररोज नवे विषय आणि नवे विचार आकार घेत असतात.
“कर्तव्याची सावली” या कवितेच्या माध्यमातून पोलिसांच्या सेवाभावाला आणि त्यागाला शब्दांची सलामी देत कवी सुदर्शन एम.लांडेकर यांनी ही कविता देवरी पोलीस स्टेशनला सन्मानार्थ अर्पण केली. यावेळी त्यांनी कविता पोलीस निरीक्षक गणेश वगारे तसेच देवरी पोलीस स्टेशनमधील कर्मचारीवर्ग यांच्या सुपूर्द केली.
कवी सुदर्शन एम.लांडेकर यांच्या या उपक्रमाचे पोलीस विभागाकडून कौतुक करण्यात आले. बंदुकीच्या धैर्याला लेखणीची सलामी आणि कर्तव्याच्या सावलीला कवितेची मानवंदना, असा भावनिक स्पर्श या उपक्रमातून अधोरेखित झाला.








