सडक अर्जुनी: महामार्गावर अपघात झाला की काही क्षणांत परिस्थिती गंभीर बनते. अशा वेळी मदतीसाठी पुढे येणारा प्रत्येक हात एखाद्याचा जीव वाचवू शकतो. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सातत्याने धावून जाणारे पत्रकार गुरुदेवसिंह उर्फ मुन्नासिंह ठाकूर यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्याची दखल घेत ‘मृत्युंजय दूत’ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी विशेष गौरव करण्यात आला.
महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव, जिल्हा गोंदिया येथे हा गौरव सोहळा पार पडला. महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणाऱ्या नागरिकांचा आणि सेवाभावी व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
पत्रकार म्हणून घटनास्थळी पोहोचल्यानंतर केवळ बातमी किंवा छायाचित्रण न करता जखमी व्यक्तीला तातडीने मदत मिळवून देणे, पोलिसांना माहिती देणे, वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि जखमीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेणे, या कार्यामुळे मुन्नासिंह ठाकूर यांची ‘मृत्युंजय दूत’ म्हणून निवड करण्यात आली.
पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या या कार्याचा पोलीस विभागाने केलेला गौरव निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.
पाच ‘मृत्युंजय दूतांचा’ सन्मान: यावेळी अपघातग्रस्तांना मदत करणारे गुरुदेवसिंह उर्फ मुन्नासिंह ठाकूर, सेंदुरवाफा टोल नाक्याचे व्यवस्थापक संजय रॉय. सुरज सोनवणे, सागर कोटांगले, शैलेश थेर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.








