गोंदिया: जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत येत असलेल्या शाळामध्ये मुख्याध्यापकांची रिक्त पदे असल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण निर्माण झालेला होता. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मंगळवारी (दि. १९) जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ७३ शिक्षकांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तर या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन शिक्षकांची मागणी राज्यसरकारकडे टप्पा २मध्ये मागण्याचा मार्ग मोकळा झाले असल्याचे जि.प.उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जि.प. सभागृहात पदोन्नती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनाथम,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुकाअ फनेंद्र कुतीरकर उपस्थित होते. पूर्णपणे पारदर्शक प्रक्रियेने ही पदोन्नती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ७३ शिक्षकांना बढती पत्र देण्यात आले. अलीकडे शिक्षकांच्या बदल्या, निवृत्ती व रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण प्रक्रियेवर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र होते.यावेळी जि.प.उपाध्यक्ष हर्षे यांनी पदोन्नतीमध्ये दिव्यांग शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबद्दल नाराजी व्यक्त करीत प्रशासनाने नियमांची योग्य अमलंबजावणी केली नसल्याबद्दल खंत ही व्यक्त केली. ही कार्यशाळा यशस्वीकरण्याकरीता शिक्षणाधिकारी प्राथमिक सुधीर महामुनी यांच्या मार्गदर्शनात कनिष्ठ प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल,विस्तार अधिकारी श्री.डहाके,नितेश खंडेलवार,रवी टेंभरे,कैलास खोब्रागडे,एस.नागपूरे व सर्व प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचार्यांनी सहकार्य केले.








