मुदतीपुर्वीच धान खरेदीची उद्दिष्टपूर्ती, शेतकरी राजा संकटात

उद्दिष्टपूर्तीमुळे पेरणीच्या हंगामात शेतकरी संकटात, 253.56 कोटीचे धान रखडून

Deori:  उन्हाळी हंगामात जिल्हा पणन कार्यालयाला 11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट मुदतीपुर्वीच पुर्ण झाल्याने धान विक्रीसाठी नोंदणी केलेले तब्बल 35 हजार 269 शेतकरी धान विक्रीला मुकले असून उद्दिष्ट वाढविण्याची मागणी शेतकरी, लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे. आता शासनाच्या भूमिकेकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. जिल्हयात खरीप व उन्हाळी हंगामात शासनाच्या हमीभाव खरेदी योजने अंतर्गत जिल्हा पणन कार्यालयाच्या उपअभिकर्ता संस्थांतर्फे धान खरेदी केली जाते. खरेदीची संपुर्ण प्रक्रिया आभासी आहे. केंद्रावर धान विक्रीपुर्वी शेतकर्‍यांना संबंधित पोर्टलवर आवश्यक दस्ताऐवजांसह नोंदणी करणे बंधनकारक आहे. मेपासून धान खरेदी सुरू होणे अपेक्षित होते.

मात्र खरेदी 15 मेनंतरच सुरू झाली. अनेक गरजवंत शेतकर्‍यांना हमी दरापेक्षा कमी किमतीत व्यापार्‍यांना धान विक्री करून आर्थिक नुकसान पत्करावा लागला. पणन विभागाला यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी 11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट 20 जूनलाच पूर्ण झाले. धान विक्रीसाठी 60 हजार 278 शेकतर्‍यांनी नोंदणी केली. पैकी 25009 शेतकर्‍यांकडून 11 लाख 2 हजार 471 क्विंटल धान खरेदी झाले. अद्यापही तब्बल 35 हजार 269 शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. शासनाने उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकरी, लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे.

शासकीय केंद्रावर धान विक्री केल्यानंतर शेतकर्‍यांना आठवडाभरात धानाची रक्कम देणे अपेक्षित आहे. मात्र महिना लोटूनही शासनाने रक्कम उपलब्ध करून न दिल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. 25 हजार 9 शेतकर्‍यांनी 11 लाख 2 हजार 471 क्विंटल धान विक्री केले. याची किमत 253 कोटी 56 लाख 84 हजार 82 रुपये आहे. पैकी एक दमडीही शासनाने दिलेली नाही. खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. शेतकर्‍यांना बियाणे, खते, किटकनाशके, मशागतीसाठी पैशाची गरज असताना धानाची रक्कम न मिळाने शेतकरी संकटात सापडला आहे.

पणन विभागाला रब्बी हंगामासाठी 11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. नोंदणी केलेल्यांपैकी 35 हजार 269 शेतकर्‍यांची धान विक्री शिल्लक आहे. 

– विवेक इंगळे जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें