राज्यातील अव्वल जिल्हातील ६० डिजिटल शाळांची बिल न भरल्याने बत्ती गूल

गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील १५८२ जि. प. शाळा लोकसहभागातून डिजिटल झाल्या. सर्वाधिक शाळा डिजिटल करून गोंदिया जिल्हा राज्यातील दुसरा डिजिटल जिल्हा झाला. परंतु सद्यःस्थितीत ६० शाळांमधील विद्युतपुरवठा खंडित आहे. यापैकी १९ शाळांचे वीजबिल न भरल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. तर ४१ शाळांमध्ये वीज कनेक्शनच नाही.

विज्ञान युगात विद्यार्थ्यांना पाठीवरचे ओझे कमी व्हावे तसेच त्यांना एका क्लीकवर सर्व अभ्यासक्रमांची माहिती मिळावी यासाठी शासनाने शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेतला. यासाठी अनुदान न देता लोकसहभागातून गावातील शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली. ही जबाबदारी पेलत गोंदिया जिल्ह्यातील शाळा डिजिटल झाल्या आहेत; परंतु काही डिजिटल शाळा सद्यःस्थितीत अंधारात आहेत. खासगी शाळांत भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात मिळत असून जि. प. शाळात भौतिक सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याने जि. प. शाळांच्या पटसंख्येत वाढ होत नाही हे विशेष.

Share