मुंबईला जाणारे सुपारीचे ट्रक देवरीमधे गायब
५२.३६ लाखांची सुपारी गायब
Deori: ३५ टन सुपारी आसाम येथून राष्ट्रीय महामार्गाने मुंबई येथे नेत असताना एक ट्रक देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर गायब झाला. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आसामच्या कछहार जिल्ह्यातील वॉर्ड क्रमांक १२ पब्लिक स्कूल रोड सिलचर येथील ओमप्रकाश राजकुमार दुबे (३९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. शुभम ट्रेडींग कंपनीची ३५ टन सुपारी आसाम येथून वासी मुंबई येथेपाठवायची होती. ट्रक क्रमांक सीजी ०८ ए.व्ही. ७८५८ भाडे तत्त्वावर घेऊन त्यात ३५ टन सुपारी भरून आसारामवरून मुंबई नेत असताना तो ट्रक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सीमा तपासणी नाका शिरपूर (देवरी) येथे आला. परंतु तो ट्रक पुढे गेलाच नाही. त्या ट्रकमध्ये ५२ लाख ३६ हजार ८७५ रुपयांची सुपारी होती. देवरीच्या शिरपूर येथील सीमा तपासणी नाका परिसरातून ११ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता सुपारीचा ट्रक गायब झाला. या ट्रकचा चालक दिलशाह अली इर्शाद अली (३४) रा. मतीया इमालीदंड लचिपूर ता. राणीगंज जि. प्रतापगड (उत्तर प्रदेश) तर ट्रक मालक राजभूषण मनोहर वैद्य (३९) रा. कनेरी ता. सडक-अर्जुनी हे दोघेही ट्रकमधील ३५ टन सुपारी घेऊन पसार झाले. राजभूषण वैद्य याचा फोन बंद येत आहे. ओमप्रकाश दुबे यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीवर देवरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (३) ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद जाधव करीत आहेत.