महामार्गावरील ट्रक पार्किंगवर नियंत्रण कुणाचे? सात महिन्यांत रस्ता अपघातात 100 जणांचा बळी

गोंदिया : जिल्हातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आहे. मार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनांमुळे जीवघेणे अपघात होत असतात. मागील 7 महिन्यांत जिल्हाभरात झालेल्या 196 अपघातांत 100 जणांचा मृत्यू झाला तर 157 गंभीर जखमी झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळा, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून नेहमीच करण्यात येते. यासाठी जनजागृती केली जाते, पत्रके वाटली जातात. रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जातो. तरीपण जिल्ह्यात अपघातांची शृंखला काही कमी होताना दिसत नाही. बरेचसे अपघात वेगावरील नियंत्रण सुटल्याने, हेल्मेटचा वापर न करणे किंवा झोप अनावर झाल्याने होतात. वाहनचालकांमध्ये याबाबतचे प्रबोधन व्हावे, महामार्गावरील अपघात कमी व्हावे, यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्याद्वारे वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहनचालकांमध्ये जागृती केली जात आहे.

मात्र, काही वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे काहीवेळा जीवघेणे तर काहीवेळा गंभीर, किरकोळ अपघात घडतात. वाहनचालकाला अनावर झालेली झोप, अतिवेग, मद्यपान करून वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रमुख कारणांमुळे अपघात होतात. जानेवारी ते जुलै 2024 या 7 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण 196 अपघात झाले. या अपघातांमध्ये 100 जणांचा बळी गेला तर 159 जण गंभीर आणि 27 जण किरकोळ जखमींचा समावेश आहे. जखमींपैकी बहुतांश जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.

वाहन नेहमी नियंत्रणात चालवावे, सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर करावा, पालकांनी अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून खबरदारी घेतल्यास निश्‍चितच अपघात कमी होतील. सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिसांकडून सातत्याने वाहनचालकांमध्ये प्रबोधन करण्यात येते, वाहनचालकांनी वाहन जपून चालवावे.

नागेश भास्कर , पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया

Share