खासगी ट्रॅव्हल्समधून सुगंधित तंबाखूची तस्करी, देवरी पोलिसांची कारवाई
तंबाखूसह ट्रॅव्हल्सचालक ताब्यात, देवरी पोलिसांची कारवाई
देवरी : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर देवरी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी कारवाईदरम्यान एका खासगी ट्रॅव्हल्समधून दोन पोती सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्सचालकाला ताब्यात घेतले आहे.प्रवाशी वाहतुकीचा परवाना काढून खासगी प्रवाशी वाहनातून चक्क महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती देवरी पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारावर देवरी पोलिसानी बुधवार, ७ ऑगस्टला दुपारी २ वाजताच्या सुमारास देवरी येथील बसस्थानक परिसरात नाकाबंदी कारवाई केली. यावेळी रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ४७ वाय २७९४ या वाहनाची तापासणी केली असता तपासात दोन पोती सुगंधित तंबाखू आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी सुगंधित तंबाखू हस्तगत करून तंबाखूसह ट्रॅव्हल्स जप्त केली. याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.