१५% कमिशनसाठी स.अर्जुनीच्या नगराध्यक्षसह प्र.मुख्याधिकारी व नगरसेवक एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया : गोरेगावचे तहसीलदार, नायब तहसीलादर व संगणक ऑपरेटर असे तिघे एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईला आठवडा लोटला नाही की, सडक अर्जुनी नगर पंचायतीमध्ये सुरू असेल्या भ्रष्टाचाराला लाचलुचपत विभागाने उखरून काढले आहे. आज १४ मे रोजी निविदा रकमेवर १५ टक्के लाच मागणार्‍या नगराध्यक्ष, नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी, बांधकाम सभापती, नगरसेवक व दोन खाजगी व्यक्ती असे एकूण ६ जणांना जाळ्यात अडकविले. या सहाही आरोपींविरुद्ध डुग्गीपार पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींमध्ये नगराध्यक्ष तेजराम मडावी, नायब तहसीलदार शरद हलमारे, बांधकाम सभापती अश्लेश अंबादे, नगरसेवक महेंद्र वंजारी व खाजगी इसम तथा नगरसेविकेचा पती जुबेर अलीम शेख ( राजु शेख) व शुभम येरणे यांचा समावेश आहे.

सडक अर्जुनी नगर पंचायत येथे कारवाई

तक्रारदार कंत्राटदार असून त्याला सडक अर्जुुनी नगर पंचायत अंतर्गत वैशिष्टपुर्ण कामासाठी प्राप्त विशेष अनुदान लेखाशिर्षका अंतर्गत २ नाली बांधकामाच्या निविदा मंजुर झाल्या. दरम्यान सर्व अटी-शर्तीची पुर्तता करून तक्रारकर्त्याने कार्यारंभाचे आदेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु नगराध्यक्ष किशर मडावी यांनी निवेदा रकमेची १५ टक्के या प्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयाची लाच मागितली.

तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला दरम्यान आरोपी प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारे, सभापती अश्लेश अंबादे, नगरसेवक महेंद्र वंजारी, नगरसेविकेचा पती जुबेर अलीम शेख व शुभम येरणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच प्रमाणे खाजगी इसम शुभम येरणे याच्या माध्यमातून लाच स्विकारण्यात आली. या प्रकरणी सर्व सहा आरोपीविरुद्ध डुग्गीपार पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Share