देवरी तालुक्यात अवकाळी पाऊस, धानपिकासह भाजीपाला पिकांना फटका
तालुक्यातील लोहारा, सावली, ओवारा परिसरात मुसळधार
देवरी : मागील तीन दिवसांपासून सतत येत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धानपीक तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच उत्पादनावर परिणाम होत असल्याने भाजीपाला महाग झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुरुवार, ९ मे रोजी सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात सर्वत्र पाणी साचले असून, उन्हाळी हंगामातील कापलेले धान पाण्यात ओले झाले आहे. त्यामुळे ते खराब होण्याच्या वाटेवर आहे. तर, भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली आहेत. परिणामी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मजूर खर्च, औषधी खर्च, मशागत खर्च, बी-बियाणे, वतेलवर्गीय पिकांसाठी तारकाठी इत्यादींची व्यवस्था करण्यासाठी भाजीपाला उत्पादक शेतकरी पदरमोड करीत पैसा खर्च करीत असतात. अशात निसर्ग कोपला तर लावलेला खर्चसुद्धा निघत नाही.
यंदा दर तीन-चार दिवसांनी अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे तसेच वादळी वारा येत असल्यामुळे बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्ग सतत कोपत असल्यामुळे काय पेरावे, काय नाही तेच शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत असल्याचे दिसत आहेत.