गोंदिया जिल्हात वर्षभरात 6 हजार क्षय रुग्ण
गोंदिया◼️ क्षयरोगमुक्तीसाठी शासन व आरोग्य विभाग जनजागृतीसह विविध कार्यक्रम राबवित आहे. यातंर्गत खासगी रुग्णालयात निःशुल्क एक्स-रे काढण्याची सुविधा उपलब्ध केली असून 2023-24 या वर्षात जिल्ह्यातील 16 हजार 270 संशयीत लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी व आशासेविकामार्फत क्षयरोग संबंधाने जनजागृती व क्षयरूग्ण शोध मोहीम राबविवण्यात येत आहे. उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशासेविका किंवा आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत क्षयरोग संबंधाने दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप व वजनात घट असलेले रुग्ण, खोकल्यातून रक्त पडणे अशा संशयित लोकांची गृहभेटी दरम्यान शोध मोहिम राबवून आरोग्य संस्थेत ठसा तपासणी करतात. तसेच शासन संलग्न खाजगी रुग्णालयात क्षयरोग संबधाने छातीचा एक्स-रे काढण्यासाठी संदर्भित करतात. गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात 14 ठिकाणी शासन संलग्न खाजगी रुग्णालयात क्षयरोग संबधाने छातीचा एक्स-रे काढण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या रुग्णालयांत 2023-24 या वर्षात तब्बल 16 हजार 270 संशयीत लोकांनी शासनाच्या निशुल्क एक्स-रे योजनेचा लाभ घेतला आहे. दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप व वजनात घट असलेले रुग्ण, खोकल्यातून रक्त पडणे अशा संशयित लोकांनी आरोग्य संस्था किवा जवळच्या आशासेविका मार्फत आपल्या शासन संलग्न खाजगी रुग्णालयात जाऊन छातीचा एक्स-रे काढून शासनेच्या योजनेचा फायदा घ्यावा.