गोंदियात केमिकल कंपनीला भीषण आग

गोंदिया◼️ शहरातील फुलचुर नाका परिसरात एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोंदिया-गोरेगाव मार्गावर फुलचुर टोलनाका परिसरात गोंदियातील अविनाश बजाज यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी आहे. या ठिकाणी फर्निचर करिता वापरण्यात येणारे केमिकल, पॉलीश आदी साहित्य असल्याने शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

अग्निशमन दिनाच्या दिवशीच घडली घटना

४ मे सर्वत्र आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. योगायोगाने आजच्याच दिवशी ही घटना घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असताना इमारतीलाही नुकसान पोहोचले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share