इंग्रजी शाळांना आरटीईची प्रतिपुर्ती रक्कम मिळणार
गोंदिया: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेता यावे यासाठी 25 टक्के कोटा आहे. कोट्यानुसार प्रवेशित विद्यार्थ्यांचे शुल्क शासन संबंधित शाळांना देते. ही प्रतिपूर्तीची रक्कम देण्यास शासनाकडून नेहमीच विलंब होतो. अनेक शाळांची गत तीन वर्षापासून कोट्यावधीची प्रतिपुर्ती रक्कम प्रलंबित असताना सन 2022-23 सत्रातील प्रतिपुर्तीची सुमारे 1 कोटी 12 लाख 84 हजार रुपयाची रक्कम शासनाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केली आहे. पात्र सर्व शाळांची अद्यावत माहिती घेऊन रक्कम शाळांना देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मागील तीन वर्षांपासून शासनाकडून काही इंग्रजी शाळांना प्रतिपूर्ती मिळालेली नाही. दरवर्षी विद्यार्थी संख्येनुसार चार कोटी रुपयांचे अनुदान शाळांना प्रतिपूर्ती देण्यासाठी हवे असतात. परंतु दरवेळेस शासनाकडून थोडेच अनुदान दिले जाते. राज्य शासनाने विनाअनुदानित खासगी शाळांना आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागेवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी शासनाकडून शाळेला दरवर्षी प्रति विद्यार्थी 17 हजार 760 रुपये अनुदान दिले जाते. परंतु, 2019 पासून ही रक्कम मिळाली नाही. राज्यात आरटीईअंतर्गत सुमारे 10 हजारांहून अधिक शाळा आहेत. या शाळांमधील जवळपास साडेचार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. मात्र, तीन वर्षांपासून शासनाकडे या शाळांची आरटीईची प्रतिपूर्तीचे पंधराशे कोटीहून अधिक रक्कम थकलेली आहे.
गोंदिया जिल्ह्यात आरटीई अंतर्गत 156 शाळा नोंदणीकृत असून प्रत्यक्षात 146 शाळांमधून 814 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचे सुमारे 12 कोटी रुपये शासनाकडे थकीत असताना सन 2022 23 या वर्षासाठी पहिल्या टप्प्यात 40 लाख 88 हजार तर दुसर्या टप्प्यात 71 लाख 96 हजार असे 1 कोटी 12 लाख 84 हजार रुपयांच्या निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केला आहे. सर्व पात्र शाळांची पोर्टलवरील माहितीची तपासणी व पाहणी केली जाईल, नोंदणी असलेल्या शाळांपैकी 85 शाळांनी संबंधित पोर्टलवर माहिती अद्यावत केली आहे. या शाळांना लवकरच प्रतिपुर्ती निधी देण्यात येणार असल्याचे माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी दिघोरे यांनी सांगितले.