शीला उईके यांना आदिवासी सेवक पुरस्कार

देवरी : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे दिला जाणारा आदिवासी सेवक पुरस्कारासाठी अर्जुनी मोरगावच्या नगरसेविका शीला उईके यांची निवड झाली. त्यांचा देवरी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी समाज बांधवांचा सर्वांगीन विकासाठी उल्लेखनीय कार्य केल्याद्दल गोंदिया जिल्ह्यातून आदिवासी सेवक पुरस्कारासाठी अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका शीला सुरेश उईके यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला होता. त्याअनुषंगाने शीला उईके यांची आदिवासी सेवक म्हणून निवड झाली.

याबद्दल देवरी येथे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच 29 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात आदिवासी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शीला उईके यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करुन गौविण्यात आले आहे.

Share