भंडारा : एशियन गेममध्ये भंडा-याच्या लेकी सुसाट

भंडारा◼️तायवान येथे सुरू असलेल्या एशियन गेम स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी लुटे आणि सुशीकला आगाशे या दोन खेळाडूंनी भारतासाठी ‘ट्रॅक सायकलिंग’ या क्रीडा प्रकारात सुसाट कामगिरी करीत 2 सुवर्ण, 3 रजत आणि 1 कांस्य पदक अशा सहा पदकांची कमाई केली आहे.

मयुरी लुटे आणि सुशीकला आगाशे या दोघीही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुली असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. या दोघींनीही मिळालेल्या संधीचे ख-या अर्थाने सोने केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांची क्रिडा क्षेत्रात सुसाट वाटचाल सुरू आहे. केवळ आपल्या मेहनत आणि कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी यशाचे शिखर गाठले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली आहे. दोघीही सध्या दिल्ली येथील अ‍ॅकेडमीत प्रशिक्षण घेत आहेत. मयुरी लुटे हिला नुकताच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आला.

एशियन गेम स्पर्धेत भारतीय संघाच्या ऐतिहासिक कामगिरीत महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी मोलाची कामगिरी बजावली आहे. या संघात भंडारा जिल्ह्यातील मयुरी लुटे, सुशीकला आगाशे यांचा सहभाग असल्याने जिल्ह्याची मान उंचावली आहे.

Share